बातम्या
मधुमेहींच्या डोळ्यांची काळजी
By nisha patil - 6/13/2024 5:48:34 AM
Share This News:
सर्वसामान्य व्यक्तींच्या तुलनेत मधुमेहींमध्ये (डायबेटिक) दृष्टी गमावण्याचा धोका २५ टक्के अधिक असतो. नेत्रपटल म्हणजेच रेटिनाशी संबंधित आजार होण्याची शक्यताही अधिक असते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी डोळ्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
मधुमेहामुळे रेटिना बाधित होतो, ज्यास डायबेटिक रेटिनोपॅथी असे म्हणतात. यात रक्तवाहिन्या फुटून रक्तस्राव होण्याची शक्यता असते. डोळ्याच्या आतील पडद्यावरीलही रक्तवाहिन्या फुटून रक्त पडद्यावर जमा होण्याचा संभव असतो. यातूनच रेटिनाचा पडदा ओढला जाऊन रेटिनल डिटॅचमेंट होते, म्हणजेच पडदा सुटून अंधत्व येते. मधुमेहाचे रुग्ण वारंवार डोळ्यांची चाचणी करत नसल्याने डायबेटिक रेटिनोपॅथीच्या आजाराचे निदान वेळेत होत नाही.
डायबेटिक रेटिनोपॅथीमध्ये डायबेटिक मॅक्युलर एडेमाचा (डीएमई) प्रादुर्भावही होऊ शकतो. धूसर किंवा अस्पष्ट दिसणे, सरळ रेषा वर-खाली किंवा वाकलेल्या दिसू लागणे, विरोधी रंग किंवा एकूणच रंगांबद्दलची संवेदनशीलता कमी होणे, दूरचे पाहण्यास त्रास होणे, दृष्टीच्या मध्यावर छोटासा पण हळूहळू आकाराने वाढत जाणारा ब्लाइंड स्पॉट तयार होणे ही डीएमईची काही लक्षणे आहेत.
एखाद्या व्यक्तीला असलेला मधुमेहाचा त्रास किती जुना आहे यावर त्या व्यक्तीमधील डायबेटिक रेटिनोपॅथीची तीव्रता अवलंबून असते. दहा वर्षांपासून मधुमेहाचा त्रास असलेल्या व्यक्तीमध्ये डायबेटिक रेटिनोपॅथी उद्भवण्याचा धोका ५० टक्के इतका असतो आणि हाच काळ २० वर्षांपर्यत लांबल्यास ही शक्यता ९० टक्क्य़ांपर्यंत पोहोचते. तसेच मधुमेहावर उत्तम प्रकारे नियंत्रण ठेवले गेले नाही डायबेटिक रेटिनोपॅथीची तीव्रता वाढते, असे मुंबई रेटिना सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय दुदानी यांनी सांगितले.
मधुमेहींसाठी काही प्रतिबंधात्मक उपाय.
मधुमेहाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी दर सहा महिन्यांनी नेत्रविकारतज्ज्ञांकडून डोळ्यांची तपासणी करून घ्यावी. त्यातही रेटिना, मोतिबिंदू, काचबिंदूची तपासणी अवश्य करावी. धूसर किंवा अस्पष्ट दिसणे, विरोधी रंग किंवा एकूणच रंगांबद्दलची संवेदनशीलता कमी होणे, दूरचे पाहण्यास त्रास होणे, दृष्टीच्या मध्यावर छोटासा पण हळूहळू आकाराने वाढत जाणारा ब्लाइंड स्पॉट तयार होणे अशा प्रकारची डीएमईची कोणत्याही लक्षणे आढळत असल्यास किंवा दृष्टीमध्ये थोडाही बदल जाणवल्यास तात्काळ तज्ज्ञांकडून उपचार करावेत.
मधुमेहाचे व्यवस्थापन परिणामकारकरीत्या करण्यासाठी रक्तातील साखरेचे प्रमाण नियमितपणे तपासत राहावे.
मधुमेहींच्या डोळ्यांची काळजी
|