बातम्या

खुर्चीत तासंतास बसून काम करता, पाठ - मान दुखते?

Do you work sitting in a chair for hoursback  neck pain


By nisha patil - 10/6/2024 12:24:34 AM
Share This News:



ऑफिसमध्ये असताना आपण किमान ८ ते ९ तास खुर्चीतच बसून असतो. खुर्चीत बसून कामाला सुरुवात केल्यावर आपण जागचे फारसे हलत नाही. तासंतास आपण त्याच खुर्चीत बसून घालवतो. ब्रेक न घेता सतत असेच खुर्चीत बसून राहिल्याने आपली पाठ, कंबर, पाय आखडून जातात. यामुळे तर अनेक जणांच्या शरीराची ठेवण किंवा बसण्याची, उभे राहण्याची ठेवणही बदलली आहे. बैठ्या जीवनशैलीमुळे दिवसातील १२ ते १४ तास आपण वेगवेगळ्या स्थितीत बसलेले असतो. कधी खुर्चीवर, कधी गाडीवर, कधी सोफ्यावर. या स्थितीत पोटापासून मांडीकडे जाणारे स्नायू हे आकुंचित झालेले असतात. सतत खुर्चीवर बसून कंटाळा आल्यास एक छोटा ब्रेक घेऊन खुर्चीवर बसल्या बसल्या करता येण्यासारखे व्यायाम प्रकार समजून घेऊयात. ब्रेक घेतल्यानंतर त्या वेळेचा सदुपयोग करा आणि हे व्यायाम प्रकार करून पाहा

नक्की कोणते व्यायाम प्रकार करता येऊ शकतात...? 

१.) चेअर स्क्वाट्स...

*१. चेअर स्क्वाट्स करण्यासाठी सर्वप्रथम सरळ ताठ उभे राहा. चेअर आपल्या पाठीमागे ठेवा.

*२. आता आपले दोन्ही हात अलगद मागे नेऊन चेअरच्या दोन्ही कोपऱ्यांवर ठेवा.

*३. पाय गुढघ्यात दुमडून मग मागच्या हातांवर आणि पायांवर जोर देऊन अर्धवट खाली बसा.

*४. याच स्थितीत खाली वर उठ - बस करा.

२.) चेअर स्पायनल ट्विस्ट...

*१. दोन्ही पाय खुर्चीच्या डाव्या बाजूला करा. दोन्ही हात मागे करून त्याने खुर्चीची मागची बाजू पकडा.

*२. चेहरा आणि संपूर्ण शरीर उजव्या बाजूला करा. दिर्घ श्वास घेऊन ही अवस्था २० ते ३० सेकंद टिकविण्याचा प्रयत्न करा.
 
*३. यानंतर आता दोन्ही पाय खुर्चीच्या उजव्या बाजूला तर चेहरा आणि शरीर डाव्या बाजूला करा.
 
*४. आधीची पोझिशन जेवढ्या वेळ टिकवली तेवढाच वेळ ही आसनअवस्था टिकविण्याचा प्रयत्न करा.

३.) चेअर पुशअप्स...

*१. चेअर पुशअप्स करण्यासाठी सर्वप्रथम सरळ ताठ उभे राहा. चेअर आपल्या डोळ्यांसमोर ठेवा.

*२. आता आपल्या दोन्ही हातांनी खुर्चीचे आपल्यासमोरील दोन्ही कोपरे धरा.

*३. मग पाय लांब करत पाठ सरळ रेषेत ठेवत पोटाच्या कोर भागावर जोर द्या.

*४. त्यानंतर गुढघ्यांना हलकेच दुमडून, हातसुद्धा कोपऱ्यात दुमडून घेत हळुहळु खुर्चीवर पुढच्या बाजूस झुका.

*५. आता परत आपल्या हातांच्या दुमडलेल्या कोपऱ्यांना सरळ करत खुर्ची पासून वर या.

*६. असे किमान १० ते १५ वेळा करा. 

४.) चेअर वीरभद्रासन...

*१.  उजवा पाय खुर्चीच्या थोडा बाहेर काढून उजव्या दिशेला फिरवा.

*२. डावा पाय डाव्या बाजूला बाहेर काढा आणि तो गुडघ्यातून वाकणार नाही, याची काळजी घ्या.

*३. आता दोन्ही हात खांद्याला समांतर पसरवा. चेहरा उजव्या हाताकडे वळवा तसेच छाती, पोट हे देखील उजव्या हाताकडे वळवा.

*४. ही आसनस्थिती काही सेकंद टिकविण्याचा प्रयत्न करा. आता हेच आसन दुसऱ्या बाजूने करावे.


खुर्चीत तासंतास बसून काम करता, पाठ - मान दुखते?