बातम्या
फेअरनेस क्रीम लावून रंग गोरा होतो का ?
By nisha patil - 5/18/2024 5:54:48 AM
Share This News:
लहानपणी अंगाला खूप साबण लावून रंग गोरा करण्याच्या प्रयत्नात जीव गमावणाऱ्या कावळ्याची कथा आपण सर्वांनीच वाचली आहे. त्यामुळे त्वचेचा रंग बदलण्याचा दावा करणाऱ्या सौंदर्य प्रसाधनांच्या उपयुक्ततेविषयी तुमच्या मनात नक्कीच संभ्रम निर्माण झाला असेल.
त्वचेत असणार्या मेलॅनीन या रंगद्रव्याच्या प्रमाणावर त्वचेचा रंग अवलंबून असतो. हे द्रव्य जास्त असल्यास रंग काळा तर कमी असल्यास गोरा असतो. या रंगद्रव्याचे प्रमाण हे मुख्यतः अनुवंशिक कारणांवर अवलंबून असते. मात्र पर्यावरणाचा देखील त्यावर परिणाम होत असतो. म्हणूनच एखाद्या व्यक्तीने सतत रणरणत्या उन्हात काम केले तर तिचा रंग काळवंडतो. मेलॅनीन खेरीज केरॅटिन हे पिवळसर रंगद्रव्य व हिमोग्लोबिन हा रक्तातील लाल रंगाचा घटक यावरही त्वचेचा रंग अवलंबून असतो.
हर्बल वा इतर विशेषणे लावून विकल्या जाणाऱ्या फेअरनेस क्रिममुळे अनुवांशिक घटकांवर काहीच परिणाम होणार नाही. या क्रीममुळे त्वचेवर होणारा सूर्यप्रकाशाचा परिणाम काही अंशी कमी करता येऊ शकेल, परंतु ही क्रीम लावून काळ्या रंगाची व्यक्ती लख्ख गोरी होणार नाही हे अगदी सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे.
उन्हात न जाणे, गेल्यास चेहऱ्याला स्कार्फ बांधणे, चेहरा दिवसांत चार पाच वेळा स्वच्छ पाण्याने धुणे, समतोल आहार घेणे, नियमित व्यायाम करणे, जागरण टाळणे या उपायांनी महागड्या फेअरनेस क्रीम इतकाच वा जास्तच परिणाम होईल यात शंका नाही.
महत्त्वाचे म्हणजे रंगावर माणसाचे गुण अवलंबून नसतात. मग रंगांमागे धावायचे कशासाठी याचाही विचार करायला हवा. म्हणूनच संत 'काय भुललासी वरलीया रंगा' असं म्हटले असतील का ?
फेअरनेस क्रीम लावून रंग गोरा होतो का ?
|