बातम्या

कोरडा खोकला

Dry cough


By nisha patil - 7/19/2024 7:40:08 AM
Share This News:



हा  खोकला अतिशय त्रासदायक असतो. खोकताना पोट आणि बरगड्यांमध्ये तीव्र वेदना होतात. काही घरगुती उपाय करून तुम्ही कोरड्या खोकल्याच्या त्रासातून स्वतःला मुक्त करू शकता.

कोरडा खोकला दूर करण्यासाठी ६ घरगुती उपायः-

बदलत्या हवामानामुळे आपल्याला छोट्या-मोठ्या आजारांची लागण होते. यातही सर्दी, खोकला आणि ताप येण्याच्या तक्रारी अधिकतर उद्भवतात. सर्दी आणि तापामुळे खोकल्याचा त्रास अधिक बळावतो. त्यातही कोरडा खोकला त्रासदायक असतो. योग्य वेळेत यावर उपाय केल्यास तुम्हाला आराम मिळेल. पण दुर्लक्ष केलं तर प्रकृती गंभीर देखील होऊ शकते.

खोकल्याचा त्रास कमी प्रमाणात असला तरीही त्यावर उपाय करणं आवश्यक आहे. 

यासाठी तुम्ही घरगुती तसंच नैसर्गिक उपचारांची मदत तुम्ही घेऊ शकता. 

सर्दी, खोकला होणे ही छोटी समस्या समजून त्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. याच निष्काळजीपणामुळे गंभीर आजारांची लागण होण्याची शक्यता असते. 

आजारांना स्वतःपासून दूर ठेवण्यासाठी आपल्या आहारामध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश करा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा.

मध

कोरड्या खोकल्यावर मधाचे सेवन करणं हा रामबाण उपाय मानले जाते. मधामुळे घशातील खवखव कमी होते. तसंच घशामधील संसर्गही दूर होतो. कोरडा खोकला कमी करण्यासाठी छोट्या ग्लासमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यात दोन चमचे मध मिक्स करा. मध आणि पाणी नीट मिक्स झाल्यानंतर ते प्या. नियमित हा उपाय केल्यास कोरड्या खोकल्यापासून तुम्हाला आराम मिळेल.

आले आणि मीठ

खोकला कमी करण्यासाठी नैसर्गिक उपाय म्हणून आल्याचा फार पूर्वीपासून वापर केला जात आहे. आल्याचा छोटा तुकडा कुटून घ्या आणि त्यामध्ये चिमूटभर मीठ मिक्स करा. हे मिश्रण आता आपल्या दाढेखाली ठेवा आणि त्याचा रस हळूहळू घशामध्ये उतरू द्यावा. पाच मिनिटांनंतर आले बाहेर फेका आणि कोमट किंवा साध्या पाण्याने गुळण्या करा. पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ आले तोंडामध्ये ठेवू नका.

ज्येष्ठमधाचा चहा

ज्येष्ठमधाचा चहा प्यायल्यानंतर कोरडा खोकला कमी होतो. हा चहा तयार करण्यासाठी कपभर पाण्यामध्ये दोन मोठे चमचे ज्येष्ठमधाची पावडर उकळत ठेवा. १० ते १५ मिनिटे पाणी उकळू द्या. यानंतर कपामध्ये चहा गाळून घ्या. तुम्हाला हवे असल्यास चहामध्ये मध मिक्स करू शकता. दिवसातून दोन वेळा हा चहा घेवू  शकता.

हळदीचे दूध

हळदीचे दूध प्यायल्याने केवळ खोकलाच नाही तर कित्येक आजारांपासून तुमची सुटका होण्यास मदत मिळते. एक ग्लास दुधामध्ये अर्धा चमचा हळद मिक्स करून नियमित प्या. तुमचा कोरड्या खोकल्याचा त्रास काही दिवसात कमी होईल. हळदीमध्ये कर्रक्युमिन नावाचे घटक असते. या घटकामुळे सर्दी, खोकला आणि श्वसनाशी संबंधित कित्येक आजारांचा त्रास कमी होतो.

गूळ

सर्दी आणि खोकल्यावर गूळ खाणे हा प्रभावी उपाय आहे. गुळातील पोषक घटकांमुळे जमा झालेला कफ बाहेर पडण्यास मदत मिळते. 

सर्दी खोकल्याव्यतिरिक्त गुळामुळे पचनाशी संबंधित समस्या देखील कमी होतात. कोमट पाण्यामध्ये गूळ पावडर मिक्स करा आणि प्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रमाण आणि दिवसातून किती वेळा हा उपाय करावा, याबाबत सल्ला घ्या.

मिठाच्या पाण्याच्या गुळण्या
एका मोठ्या ग्लासमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यामध्ये एक चमचा मीठ मिक्स करा. या पाण्याने गुळण्या करा. दिवसातून दोन वेळा हा उपाय करावा. खोकला आणि घशातील खवखव कमी करण्यासाठी हा रामबाण उपाय आहे. मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्यानं श्वसन नलिकेतील संसर्ग दूर होण्यास मदत मिळते. शिवाय खोकल्यामुळे घशामध्ये होणाऱ्या वेदनाही कमी होतात.

गरम पाण्याची वाफ

सर्दी खोकल्यामुळे कधी कधी आपल्याला श्वास घेणे देखील कठीण होते. अशा वेळेस गरम पाण्याची वाफ घ्यावी. गरम पाण्याच्या वाफेमुळे कफ बाहेर पडतो. श्वासोच्छवास करताना होणाऱ्या अडचणी दूर होतात. तसंच चेहऱ्यावरील रोम छिद्रांमध्ये जमा झालेली धूळ, माती आणि दुर्गंध देखील बाहेर फेकली जाते. पण आठवड्यातून दोन वेळाच हा उपाय करावा. अन्यथा चेहऱ्याच्या त्वचेवर दुष्परिणाम होऊ शकतात.


कोरडा खोकला