बातम्या

दर ७ दिवसांनी एकदा कोबी खाल्ल्याने शरीराला मिळतात ‘हे’ मोठे फायदे

Eating cabbage once every 7 days gives the body these great benefits


By nisha patil - 5/29/2024 6:25:20 AM
Share This News:



मंचुरियन, पनीर टिक्का, चिकन चिली ते चायनीज भेळीसहीत अन्य अनेक पदार्थांच्या जोडीला वाढल्या जाणाऱ्या कोबीला आता तुमच्या जेवणातील मुख्य पात्र बनवण्याची वेळ आली आहे. असं का? याचं उत्तर आज आपण तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत. रोजच नव्हे पण निदान आठवड्यातून कोबीची भाजी खाल्ल्याने तुम्हाला काय व किती फायदे मिळू शकतात याविषयी माहिती मिळवण्यासाठी आजचा विशेष लेख आवर्जून वाचा. आजवर अनेक तज्ज्ञांनी मान्य केलेले कोबीचे फायदे म्हणजे ही अनेक थरांची भाजी विविध स्तरांवर आपल्या आरोग्याला सुधारण्यास हातभार लावत असते. उदाहरणासह सांगायचं तर, पचनास मदत करण्यापासून ते जुनाट आजार होण्याचा धोका कमी करण्यापर्यंत, तुमच्या जेवणात कोबीचा समावेश करणे हे नक्कीच आरोग्यदायी ठरू शकते.

आतड्यांसाठी कोबीचे फायदे...
कोबी हा फायबरचा समृद्ध स्रोत आहे व फायबर हा पचनप्रक्रियेत योगदान देणारा महत्त्वाचा घटक आहे. यशोदा हॉस्पिटल्स, हैदराबाद येथील वरिष्ठ सल्लागार डॉ दिलीप गुडे यांनी आपल्या रोजच्या आहारात अर्धा ते तीन चतुर्थांश कप शिजवलेला कोबी किंवा दीड कप कच्चा कोबी समाविष्ट करण्याचा सल्ला दिला आहे. डॉ. गुडे सांगतात की, कोबीमधील फायबर मल निर्माण करण्यास मदत करते त्यामुळे शरीरातून घातक घटक बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेतील नियमितपणा वाढतो परिणामी बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. याव्यतिरिक्त, कोबीमधील काही फायबर प्रीबायोटिक्स म्हणून कार्य करतात, तुमच्या आतड्यातील चांगल्या जीवाणूंना आहार देतात. हे आतड्यांचे आरोग्य सुधारू शकते आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते.

व्हिटॅमिन पॉवरहाऊस...
कोबी हा जीवनसत्त्वांचा खजिना आहे. यातील व्हिटॅमिन सी तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीला वाढवतो आणि निरोगी त्वचेसाठी कोलेजन उत्पादनास प्रोत्साहन देतो. कोबीमध्ये व्हिटॅमिन के देखील आहे, जे रक्ताच्या गुठळ्या थांबवण्यासाठी आणि हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. कोबीमधील बी जीवनसत्त्वे चयापचय आणि मज्जासंस्थेच्या कार्यामध्ये भूमिका बजावते.

वजनावर नियंत्रण...
कोबी ही कमी-कॅलरी, कमी चरबीयुक्त भाजी आहे, त्यामुळे वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे. कोबीमधील फायबर तुम्हाला जास्त काळ पोट भरल्याचे भासवते त्यामुळे सतत खाण्याचे प्रमाण कमी होऊन वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. डॉ. गुडे यांनी स्पष्ट केले की प्रत्येकी एक कप कोबीमध्ये ३३ कॅलरीज व उच्च फायबर असते. त्यामुळे कोबीची भाजी आतड्यांचे आरोग्य सुधारू शकते, बद्धकोष्ठता आणि जळजळ रोखण्यात मदत करू शकते आणि यकृताच्या आरोग्यास प्रोत्साहन देऊ शकते.

कोबीचे सेवन कुणी टाळावे...?
आता लक्षात ठेवायच्या काही महत्त्वाच्या गोष्टी सुद्धा पाहूया. भलेही कोबी भरपूर फायदे देणारी भाजी असेल पण संयम महत्त्वाचा आहे. जास्त प्रमाणात सेवन केल्याने सूज येणे आणि गॅस होणे, विशेषत: उच्च फायबरयुक्त आहाराची सवय नसलेल्यांना त्रास होण्याची शक्यता असते.

 हायपोथायरॉईडीझम असलेल्या लोकांनी कोबी टाळावा कारण त्यामुळे थायरॉक्सिन हॉर्मोन्सच्या निर्मितीमध्ये व्यत्यय येऊ शकतो. मधुमेहींनी देखील सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण उच्च फायबरमुळे हायपोग्लाइसेमिया (रक्तातील साखर खूपच कमी होणे) स्थिती उद्भवू शकते.


दर ७ दिवसांनी एकदा कोबी खाल्ल्याने शरीराला मिळतात ‘हे’ मोठे फायदे