बातम्या
महावितरणच्या 'अभय' योजनेला वीज ग्राहकांचा प्रतिसाद
By nisha patil - 3/18/2025 10:51:37 PM
Share This News:
महावितरणच्या 'अभय' योजनेला वीज ग्राहकांचा प्रतिसाद
१३,६३२ वीज ग्राहकांनी भरली १० कोटी ५५ लाखांची थकबाकी
अभय योजनेचे शेवटचे फक्त १३ दिवस शिल्लक
कोल्हापूर/ सांगली, दि.१८मार्च २०२५: विजेच्या बिलाचा वेळीच भरणा न केल्याने कोल्हापूर परिमंडल कार्यालयांतर्गत ९७,३८६ ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित केला होता. या ग्राहकांना थकबाकीतून मुक्त होऊन पुन्हा वीज जोडणी घेण्याची संधी अभय योजनेच्या माध्यमातून महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. या संधीचा लाभ घेत कोल्हापूर परिमंडल कार्यालयातील १३,६३२ लघुदाब व उच्चदाब वीज ग्राहकांनी १० कोटी ५५ लाखांचा भरणा करत आपला सहभाग नोंदवला आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ८,५५७ ग्राहकांनी ७ कोटी ११ लाख तर सांगली जिल्ह्यातील ५,०७५ ग्राहकांनी ३ कोटी ४४ लाख रुपयांचा भरणा केला आहे.
मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, वीजबिलांची थकबाकी असलेल्या एखाद्या जागेची मालकी बदलल्यानंतर देखील नवीन जागामालक किंवा ताबेदारांना थकबाकीची रक्कम भरावी लागेल. त्यामुळे जागा वापरासह विजेची गरज असो किंवा नसो, मात्र वीजबिलांच्या थकबाकीतून मुक्त होण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध आहे. अभय योजनेनुसार थकबाकीदारांनी केवळ मूळ थकबाकीचा भरणा केल्यास संपूर्ण १०० टक्के व्याज व विलंब आकाराची (दंड) रक्कम माफ होत आहे.
योजनेचे शेवटचे फक्त १३ दिवस शिल्लक
वीजबिलांच्या थकबाकीमुळे दि. ३१ मार्च २०२४ पर्यंत कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या तसेच कृषी व सार्वजनिक पाणीपुरवठा योजना वगळून उर्वरित सर्व अकृषक वीजग्राहकांसाठी महावितरण अभय योजना दि. ३१ मार्च २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना या योजनेत सहभाग नोंदवण्या करिता आजपासून (दि.१९) फक्त १३ दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त वीज ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
अद्याप ८३,७५४ ग्राहकांना योजनेत सहभाग नोंदवण्याची संधी
महावितरणने कायमस्वरूप वीज पुरवठा खंडित केलेल्या ८३,७५४ ग्राहकांना या योजनेत सहभाग नोंदवण्याची संधी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ३२,२४५ वीज ग्राहक तर सांगली जिल्ह्यातील ५१,५०९ ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पत्र आहेत.
जनमित्रांची महत्वाची भूमिका
या योजनेच्या जनजागृतीत जनमित्र अर्थातच वायरमन यांचे महत्वाचे योगदान आहे. ग्राहकांच्या शंकेचे निरसन केल्याने ते थकीत वीज बिल भरत आहेत. जनमित्र गावागावांत प्रत्यक्ष जाऊन ग्राहकांना या योजनेची माहिती व महत्व पटवून देत आहेत. जनमित्रांकडून जनजागृती अभियान सकारात्मक दृष्टीने राबविल्याने अभय योजनेस कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे.
महावितरणच्या 'अभय' योजनेला वीज ग्राहकांचा प्रतिसाद
|