बातम्या
जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्वावर सधन कुक्कुट विकास गटाची स्थापना
By nisha patil - 3/8/2024 8:23:28 AM
Share This News:
परसातील कुक्कुटपालनास प्रोत्साहन देत ही प्रक्रिया रोजगारक्षम करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील सध्यस्थितीत मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र असलेला करवीर तालुका वगळून 11 तालुक्यांमध्ये सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्वावर सधन कुक्कुट विकास गटाची स्थापना करण्यात येणार आहे. 11 तालुक्यांपैकी भुदरगड व चंदगड वगळता नऊ तालुक्यांमध्ये सधन कुक्कुट विकास गटाची स्थापना झालेली आहे. उर्वरित भुदरगड व चंदगड तालुक्यासाठी सन 2024-25 मध्ये तिसऱ्यांदा नव्याने अर्ज मागवून निवड प्रक्रिया राबवून लाभ दिला जाणार असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एम.ए.शेजाळ यांनी दिली आहे.
मार्गदर्शक सुचना-
योजनेंतर्गत एकूण प्रकल्पाची किंमत 10 लाख 27 हजार 500 रुपयांपैकी सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना शासनाचे 50 टक्के अनुदान म्हणजेच 5 लाख 13 हजार 750 रु. देय असून उर्वरित 50 टक्के रक्कम लाभार्थी स्वतःचा हिस्सा किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घेऊन उभा करु शकेल. लाभार्थी, अर्जदाराची वयोमर्यादा 18 ते 60 वर्षे राहील, लाभार्थी निवडताना 30 टक्के महिला लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत प्राधान्य देण्यात येईल. सन 2018-19 पासून टप्प्याटप्याने उपलब्ध होणाऱ्या तरतुदीस अधीन राहून ही योजना राबविण्यात येत असून सद्यस्थितीत भुदरगड, व चंदगड या दोन तालुक्यातील लाभार्थी निवडीसाठी पात्र लाभार्थींकडून 5 ते 20 ऑगस्ट 2024 पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज मागविण्यात येत आहेत. लाभार्थीकडे 2500 चौ.फू. जागा स्वतःच्या मालकीची असावी. तसेच त्या ठिकाणी दळणवळणाची, पाण्याची व विद्युतीकरणाची सुविधा उपलब्ध असावी. प्रकल्प कार्यान्वित करताना शासनाचे अनुदान एकदाच देय असून, त्यानंतर प्रकल्प सुरळितरित्या चालू ठेवून पुढील खर्च संपूर्णपणे लाभार्थीने करावयाचा आहे.
या योजनेंतर्गत प्रकल्प उभारणीसाठी लाभार्थीनी बँकेकडून कर्ज घेतल्यास कर्जाची परतफेड स्वतः लाभार्थीने करावयाची असून कर्ज परतफेडीची जबाबदारी शासनाची राहणार नाही. निवडलेल्या लाभार्थ्यांनी या योजनेअंतर्गत सधन कुक्कुट गटाच्या कामाचे व कुक्कुटपालनाचे पाच दिवशीय प्रशिक्षण नजिकच्या सधन कुक्कुट विकास प्रकल्पामार्फत घेणे बंधनकारक राहील. पक्षीगृहाचा उपयोग कुक्कुटपालनासाठीच करणे बंधनकारक राहील. कुक्कुट पक्षीगृहाच्या बांधकामासाठी प्रकल्प खर्चापेक्षा जास्त खर्च आल्यास तो लाभार्थ्यांनी स्वतः करावयाचा आहे. लाभार्थीस हा व्यवसाय किमान तीन वर्षे करणे तसेच शासनास हमीपत्र देणे बंधनकारक राहील. लाभार्थीस पक्षीगृह बांधकाम, लघु अंडी उबवणूक यंत्र, एकदिवशीय पिलांची 20 आठवडे वयाचे अंड्यावरील पक्षी, उबवणुकीची अंडी यांची खरेदी तसेच इतर पायाभत सुविधा शासनाच्या निकषाप्रमाणे करणे बंधनकारक राहील. वरीलप्रमाणे सर्व बाबींची व कागदपत्रांची पूर्तता करुन तसेच पडताळणी झाल्यानंतरच शासन निर्णयात नमूद संबंधित 13 बाबींच्या देय अनुदान जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्यामार्फत लाभार्थीच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येईल. लाभार्थीनी विहित नमुन्यातील अर्ज भुदरगड व चंदगड तालुक्यातील पशुधन विकास अधिकारी (विस्तार), (पंचायत समिती) यांच्याकडून प्राप्त करुन घ्यावेत, संबंधित पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांनी प्राप्त झालेले अर्ज जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद यांच्यामार्फत लाभार्थी निवडीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कोल्हापूर यांच्याकडे सादर करावेत.
योजनेचे लाभार्थी निवडीचे निकष / अटी व शर्ती :-
सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व जनजाती क्षेत्र उपयोजनेतील जे लाभार्थी सध्यस्थितीत कुक्कुटपालन व्यवसाय करीत आहेत तसेच ज्या लाभार्थींकडे लघु अंडी उबवणूक यंत्र आहे, अशा लाभार्थ्यांना या योजनेंतर्गत प्राधान्य देण्यात येईल. तसेच कुक्कुट व्यवसायात स्वयंरोजगार निर्मितीची आवड असणारे नवउद्योजकही अर्ज करु शकतात. प्रकल्प कार्यान्वित करण्याकरिता आवश्यक असणारी साधने, सुविधा व व्यवहार्यता पडताळून लाभार्थी निवडण्यात येतील.
प्रकल्पांतर्गत विविध घटक व आर्थिक निकष :-
जमीन 2500 चौ.फू. (1000 चौ. फुटाचे 2 शेड, खाद्य, अंडी साठवणूक व अंडी उबवणूक यंत्र ठेवण्यासाठी स्वतंत्र खोल्या) जमीन लाभार्थींच्या स्वतःच्या मालकीची असेल.
प्रति 1000 चौ. फुटाच्या 2 पक्षीगृहाचे बांधकाम, स्टोअर रुम, पाण्याची टाकी, विद्युतीकरण यासाठी 2 लाख रुपये अनुदान. खाद्य व पाण्याची भांडी, ब्रुडर, इतर उपकरणे व लसीकरणासाठी 25 हजार रुपये अनुदान, लघु अंडी उबवणी यंत्रासाठी 90 हजार रुपये अनुदान, 1000 एकदिवशीय मिश्र (नर + मादी) पिले प्रति पक्षी 60 रु. साठी 30 हजार रुपये अनुदान, 20 आठवड्यांच्या अंड्यावरील 500 पक्षी (नर + मादी) प्रति पक्षी 150 रु. साठी 37 हजार 500 रुपये अनुदान, उबवणुकीची अंडी 400 (प्रति अंडी रु.10/-) यासाठी 200 रुपये अनुदान, 1 हजार एकदिवशीय पिलांसाठी 20 आठवडे कालावधीपर्यंत पक्षी खाद्य पुरवठा (प्रति पक्षी एकूण 8.50 कि.ग्रॅ. खाद्य प्रति किलो रु.25/- दराने) यासाठी 1 लाख 6 हजार 250 रुपये अनुदान, एग नेस्टस साठी 15 हजार रुपये अनुदान व पक्षी खाद्य ग्राईंडर (सिंगल फेज) साठी 8 हजार रुपये अनुदान असे एकूण 5 लाख 13 हजार 750 रुपयांचे अनुदान
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे-
फोटो आयडी, आधार कार्ड, ओळखपत्राची सत्यप्रत, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, लाभधारकाकडील मालमत्ता 7/12 व 8-अ उतारा आणि ग्रामपंचायत नमुना नं.8, कुक्कुट पालन व्यवसाय विषयक प्रशिक्षण घेतलेल्या प्रमाणपत्रांची छायांकित सत्यप्रत इ.
योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, कोल्हापूर तसेच पशुधन विकास अधिकारी (विस्तार),पंचायत समिती भुदरगड व चंदगड यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही डॉ. शेजाळ यांनी केले आहे.
जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्वावर सधन कुक्कुट विकास गटाची स्थापना
|