बातम्या
राज्यातील शेतकऱ्यांचे ७ हजार कोटींचे एफ.आर.पी थकीत – राजू शेट्टी यांची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
By nisha patil - 3/26/2025 12:16:54 AM
Share This News:
राज्यातील शेतकऱ्यांचे ७ हजार कोटींचे एफ.आर.पी थकीत – राजू शेट्टी यांची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
पुणे (प्रतिनिधी) – राज्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांचे ७ हजार कोटी रुपये एफ.आर.पी थकीत असून, साखर आयुक्त कार्यालयाकडे दाखल झालेली २३४९ कोटी रुपयांची आकडेवारी चुकीची आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केला. थकीत एफ.आर.पी तत्काळ १५ टक्के व्याजासह शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न झाल्यास साखर आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला.
या पार्श्वभूमीवर, पुण्यात साखर आयुक्त सिद्धराम सालीमठ यांची भेट घेऊन राजू शेट्टी यांनी आर.आर.सी अंतर्गत कारवाई करून थकीत एफ.आर.पी वसूल करण्याची मागणी केली. तसेच, काटामारी, रिकव्हरी चोरी, ऑनलाईन वजनकाटे, तोडणी वाहतुकीच्या खर्चाचे निकष, आणि साखर कारखान्यांचे लेखा परिक्षण यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
शेट्टी यांनी आरोप केला की, मोजकेच नेते साखर उद्योगावर वर्चस्व ठेवून शेतकऱ्यांचे शोषण करत आहेत. साखरेसह उपपदार्थांना चांगला दर मिळत असूनही कारखानदार प्रक्रिया खर्च वाढल्याचे कारण देऊन एफ.आर.पी टप्प्याटप्प्याने देत आहेत.
राज्यातील सर्व शेतकऱ्यांना ८ दिवसांत थकीत रक्कम व्याजासह मिळाली नाही, तर साखर आयुक्त कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, ॲड. योगेश पांडे, पुणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यातील शेतकऱ्यांचे ७ हजार कोटींचे एफ.आर.पी थकीत – राजू शेट्टी यांची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
|