बातम्या

आरोग्य प्रदान करणारी मुगाची डाळ.

Health promoting chickpeas


By nisha patil - 8/5/2024 11:23:34 AM
Share This News:



जेवणाच्या ताटातली मुगाच्या डाळीच्या आमटीची वाटी म्हणजे पोषणाचा खजिना.. आरोग्य राखायचं तर जेवणात मुगाच्या डाळीचे पदार्थ हवेच.   दिसते साधी-शिजते पटकन मुगाच्या डाळीत भरपूर पोषण मिळते. वजन कमी करण्यासाठी मुगाची डाळ फायदेशीर असते.  पचन क्रिया व्यवस्थित ठेवण्यासाठी, सुधारण्यासाठी आहारात मुगाच्या डाळीला महत्व आहे. पोटातील उष्णता कमी होण्यासाठी मुगाची डाळ खावी. 
 

आरोग्यासाठी जेवणात डाळ, डाळींचे पदार्थ खाण्याला महत्व आहे. सर्वच डाळी आरोग्यासाठी पोषक असतात पण उन्हाळ्यात मुगाची डाळ खाण्याला विशेष महत्व आहे. मुगाच्या डाळीत काॅपर, फोलेट, रायबोफ्लेविन, क, बी 6 जीवनसत्व, फायबर, पोटॅशियम, फाॅस्फरस, मॅग्नेशियम, लोह, नियासिन, थायमिन हे घटक असतात. मूग डाळीत असलेल्या फायबरमुळे आतड्यातील घाण बाहेर टाकण्यास मदत होते. मुगाची डाळ खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. केवळ वरण आमटीच्या स्वरुपातच नव्हे तर मुगाची डाळ कचोरी, मोड आलेलेली उसळ, शिरा, खिचडी, सूप या चविष्ट आणि पौष्टिक स्वरुपात खाता येते.  मूग डाळ खाल्ल्याने वजन कमी होण्यापासून रक्तदाब नियंत्रित ठेवण्यापर्यंत आरोग्यास विविध फायदे होतात. 
 

वजन कमी करण्याचे प्रयत्न सुरु असतील तर मुगाची डाळ आहारात अवश्य असावी. मुगाच्या डाळीत कॅलरीज ( उष्मांक) कमी असतात. त्यामुळे मुगाची डाळ खाल्ल्यानं वजन नियंत्रित राहातं. वजन कमी करण्यासाठी मुगाची डाळ वरण, सूप, मोड आलेले अख्ख्या मुगाची उसळ आणि पौष्टिक खिचडीच्या स्वरुपात खाता येते. 
 

मुगाच्या डाळीत असलेले लोह, पोटॅशियम, कॅल्शियम, ब जीवनसत्व, प्रथिनं हे पोषक घटक शरीरातील अशक्तपणा दूर करुन ऊर्जा निर्माण करतात. दिवसभर शरीरात ऊर्जा टिकून राहावी यासाठी मुगाची डाळ खाण्याला महत्व आहे. 
शरीरातील कोलेस्ट्राॅल वाढल्यावर मुगाची डाळ खाणं फायदेशीर ठरतं. मुगाच्या डाळीमुळे शरीरात जास्त झालेलं कोलेस्ट्राॅलचं प्रमाण निय्ंत्रणात येतं. 
पचनासाठी मुगाची डाळ सर्वात उत्तम मानली जाते. मुगाची डाळ पचण्यास हलकी असते. पचन क्रिया व्यवस्थित ठेवण्यासाठी, सुधारण्यासाठी आहारात मुगाच्या डाळीला महत्व आहे. मुगाची डाळ खाल्ल्याने पोटातील उष्णता कमी होते. उन्हाळ्यात दिवसात मुगाच्या डाळीचं सूप पिण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. मुगाच्या डाळीत दाह आणि सूजविरोधी घट्क असल्याने उष्माघात, शरीराचं तापमान वाढणं , तहान लागणं या उन्हाळ्यातल्या समस्यांचा धोका टळतो. मुगाचं सूप प्याल्यानं उष्माघाताचा धोका टाळण्याइतका ओलावा शरीरात निर्माण होतो.   मधुमेहाचा धोका टाळण्यासाठी आहारात मुगाची डाळ असावी असं आहार तज्ज्ञ म्हणतात. मुगाच्या डाळीतील घटक रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवतात. 
मुगाच्या डाळीतील पोषक घटकांचा लाभ रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास होतो. मुगाच्या डाळीत फेनोलिक ॲसिडस, फ्लेवोनाॅइड्स, कॅफिक ॲसिड, सिनॅमिक ॲसिड ही ॲण्टिऑक्सिडस्ण्टस असतात. या ॲण्टिऑक्सिडण्टसमुळे शरीर मुक्त मुलकांचा प्रभावी सामना करतं.  मोड आलेल्या मुगामध्ये मुगाच्या डाळीपेक्षा सहापट  जास्त ॲण्टिऑक्सिडण्टस असल्याचं तज्ज्ञ म्हणतात. म्ह्णूनच आजारांचा धोका टाळण्यासाठी मुगाची डाळ,  मोड आलेले मूग खाण्याला महत्व आहे. मुगाच्या डाळीत असलेल्या फायबरमुळे, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम या घटकांमुळे आतड्यातील घाण बाहेर टाकली जाते आणि रक्तदाब नियंत्रणात राहातो.


आरोग्य प्रदान करणारी मुगाची डाळ.