बातम्या

नागीण आजार : लक्षणे आणि उपाय

Herpes Disease Symptoms and Remedies


By nisha patil - 8/28/2024 7:24:09 AM
Share This News:



नागीण का होते?
प्रामुख्यानं रक्त आणि पित्त दूषित झाल्यानं ही व्याधी होते. खारट, तिखट, उष्ण पदार्थ अतिमात्रेत सेवन करणं, दही, आंबवलेले पदार्थ, मद्य (दारु), हिरव्या पालेभाज्या, खरवस, तीळ, उडीद, कुळीथ (डुलगे) यासारखे पदार्थ, मासे, मटन, लसूण यासारखे पदार्थ वारंवार खाणं, विरुद्ध आहार सेवन करणं इत्यादी कारणांनी हा विकार होतो.

लक्षणं
यामध्ये सुरुवातीला त्वचा लाल होणं, त्याची आग होणं यासारखी लक्षणं उत्पन्न होतात. क्वचित ताप येतो. नंतर तीव्र वेदनायुक्त फोड येतात. क्वचित त्यात पाणी किंवा पू असतो. आग होते, ओढ लागते. ज्या भागावर असे फोड येतात त्यास हालचाल करता येत नाही. क्वचित कपड्याचा स्पर्श सुद्धा सहन होत नाही. अस्वस्थता, निद्रानाश यासारखी लक्षणं सुद्धा निर्माण होतात. शरीराच्या कोणत्याही भागावर यासारखे फोड येऊ शकतात. डोक्यापासून ते पाठ, पोट, चेहरा, मांडी, पाय इत्यादी कोणत्याही अवयवावर ही व्याधी होऊ शकते. याची पसरण्याची गती, त्याचं स्वरूप, तीव्र दाह आणि वेदना यामुळे नागीण झाल्यावर अस्वस्थता वाढते.
उपाय
याचे दोषानुसार आणि स्वरूपानुसार विविध प्रकार पडतात. परंतु प्रामुख्यानं रक्त आणि पित्त यांची दुष्टी विशेषत्वानं आढळते. ही व्याधी ज्या वेगात येते तशी ती गतीने कमी सुद्धा होते. परंतु क्वचित प्रसंगी ते फोड नाहिसे झाल्यावर त्या जागी वेदना किंवा ओढ बरेच दिवस टिकते. अन्यथा ७-८ दिवसात नागीण कमी होते. यावर उपचार करताना सुरुवातीला लंघन करावं. पचायला हलके पदार्थ जसे भाताची पेज, साळीच्या लाह्या, भाज्यांचं सूप यासारखे पदार्थ घ्यावेत. नंतर विरेचन म्हणजे जुलाबाचं औषध घ्यावं. यामुळे पित्ताचे प्रमाण त्वरित कमी होते आणि वेदना आणि दाह म्हणजे जळजळ कमी होते. विरेचनासाठी एरंडेल तेल, गंधर्व हरितकी, अभयादि मोदक यांसारखी औषधं वैद्यांच्या सल्ल्यानं घ्यावीत. अन्य औषधी मध्ये आरोग्यवर्धिनी, चंद्रयान रस, गंधक रसायन, कैशोर, गुगुळ, लघु सूतशेखर, विषांतिदूध वटी, प्रबाळ भस्म, उशिरासव, चंदनासव, सारिवाद्यासव, अग्नितुंडी वटी यासारखी अनेक औषधे उपयुक्त ठरतात. या विकारात आयुर्वेदीय औषधांचा उपयोग चांगला आणि लवकर होतो असा अनुभव आहे. प्रामुख्याने मार्च, एप्रिल, मे या महिन्यात या विकाराचे रुग्ण जास्त संख्येने पाहायला मिळतात.
दाह आणि वेदना कमी करण्यासाठी
दाह व जळजळ कमी करण्यासाठी वरून वाळा, चंदन, गौरिक यासारख्या औषधींचा लेप लावावा. तसेच शतघौत धृत, कैलास जीवन, गायीचं तूप यासारख्या औषधांचा लेप लावावा. वेदना त्वरित कमी करण्यासाठी यामध्ये रक्तमोक्षण म्हणजे शरीरातून विशिष्ट प्रमाणात रक्त काढून टाकतात. जसे लॅबोरेटरी मध्ये तपासणीसाठी ५-१० सीसी रक्त काढलं जातं. त्याप्रमाणे या विकारात ७०-८० सीसी रक्त काढून टाकावं. प्रामुख्यानं हाताच्या कोपराच्या सांध्याच्या शिरेमधून रक्त काढतात. क्वचित प्रसंगी जळवा लावून रक्त काढून टाकता येतं. परंतु रक्तमोक्षण सारखा प्रभावी इलाज या विकारात नाही. अनेक रुग्णांमध्ये नागीण हा विकार बरा झाल्यावर जखमा भरून येतात. परंतु त्याजागी वेदना अनेक दिवस टिकतात. अशावेळी जळवा त्या स्थानी लावून रक्तमोक्षण केल्यास त्या वेदना, न्यूराल्जिया लवकर बऱ्या होतात.

आजकाल हा विकार झालेले बरेच रुग्ण पाहायला मिळतात. यामध्ये थोड्याफार फरकानं बरेच प्रकार आहेत. त्यांचं योग्य पद्धतीनं निदान होणं आवश्यक असतं. साधारणत: लालसर रंगाची पुरळ आणि वेदना दिसल्यास लगेच नागीण असं निदान करतात. परंतु बऱ्याच वेळा तसं नसतं. यासाठीच योग्य वैद्यांकडून निदान करून घेऊन चिकित्सा घ्यावी. अनेक रुग्ण मांत्रिकाकडूून मंत्रोपचार घेतात. ते अयोग्य आहे. मंत्रांनी असे विकार बरे होत नाहीत. नागिणी वरचा खरा उपाय म्हणजे योग्य उपचार आणि काटेकोर पथ्यं पाळणं हाच आहे. नागीण विकारात योग्य पथ्य पाळणं आवश्यक असतं. विरेचन, रक्तमोक्षण व आभ्यांतर हे आयुर्वेदिक उपचार या विकारात जास्त फलदायी ठरतात.


नागीण आजार : लक्षणे आणि उपाय