बातम्या

वटपौर्णिमेला स्त्रियांनी वटवृक्षाची पूजा करण्याचे आणि सूत गुंडाळण्याचे महत्त्व...

Importance of women worshiping banyan tree and winding yarn on Vatpurnima


By nisha patil - 6/21/2024 12:36:46 AM
Share This News:



वटपौर्णिमेला स्त्रियांनी वटवृक्षाची पूजा करण्याचे आणि सूत गुंडाळण्याचे महत्त्व...

ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. पंचांगानुसार आज (16 जून, रविवार) वटपौर्णिमा आहे. हे व्रत सुवासिनी अपल्या पतिला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात. सती सावित्रीचे नाते या वटवृक्षाशी निगडित आहे.


वटपौर्णिमेचे व्रत सुरू होण्यामागील पूर्वपीठिका :
यमधर्माने सत्यवानाचे प्राण हरण केल्यावर सावित्रीने यमधर्माशी तीन दिवस शास्त्रचर्चा केली. त्यावर प्रसन्न होऊन यमधर्माने सत्यवानाला पुन्हा जिवंत केले. ही चर्चा वटवृक्षाच्या झाडाखाली झाली; म्हणून वटवृक्षाशी सावित्रीचे नाव जोडले गेले. सावित्रीप्रमाणेच आपल्या पतीचे आयुष्य वाढावे म्हणून स्त्रियांनी या व्रताची सुरुवात केली.


व्रताची देवता: सावित्रीसह ब्रह्मा ही या व्रताची मुख्य देवता आहे.


वटपौर्णिमेला स्त्रियांनी वटवृक्षाची पूजा करण्याचे महत्त्व :
वटवृक्ष हा शिवरूपी आहे. शिवरूपी वटवृक्षाची पूजा करणे, म्हणजे वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीलाच एकप्रकारे स्मरून, त्याचे आयुष्य वाढून त्याची आयुष्यातील प्रत्येक कर्माला साथ मिळावी, यासाठी ईश्‍वराची पूजा करणे. कर्माला शिवाची जोड असेल, तर शक्‍ती व शिव यांच्या संयुक्‍त क्रियेने व्यवहारातील कर्म साधना बनून त्याचा जिवाला फायदा होतो.


वटवृक्षाला सूत गुंडाळण्याचे महत्त्व....
वटवृक्षाच्या खोडाच्या उभ्या छेदावर असणार्‍या सुप्‍त लहरी शिवतत्त्व आकृष्ट करून वायुमंडलात प्रक्षेपित करतात. ज्या वेळी वटवृक्षाच्या खोडाला सुती धाग्याने गुंडाळले जाते, त्या वेळी जिवाच्या भावाप्रमाणे खोडातील शिवतत्त्वाशी संबंधित लहरी कार्यरत होऊन आकार धारण करतात. सुती धाग्यातील पृथ्वी व आप या तत्त्वांच्या संयोगामुळे या लहरी जिवाला ग्रहण करण्यास सुलभ होतात.


वडाच्या पूजनामध्ये पाच फळे का अर्पण करावीत ?
फळे ही मधुररसाची, म्हणजेच आपतत्त्वाची दर्शक असल्याने फळांच्या समुच्चयाकडे आकृष्ट व प्रक्षेपित होणार्‍या देवतांच्या लहरी कमी कालावधीत जिवाच्या देहातील कोषांपर्यंत झिरपू शकतात.


प्रार्थना : सर्व पवित्र वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. अशा वटवृक्षाचे पूजन करून स्त्रिया `मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे', अशी प्रार्थना करतात.


वटपौर्णिमेला स्त्रियांनी वटवृक्षाची पूजा करण्याचे आणि सूत गुंडाळण्याचे महत्त्व...