बातम्या

जाणून घ्या अंगारक संकष्ट चतुर्थी बद्दल माहिती

Know information about Angarak Sanksha Chaturthi


By nisha patil - 6/25/2024 6:36:12 AM
Share This News:




जेव्हा मंगळवारी संकष्टी येते तेव्हा त्या दिवसाला अंगारकी चतुर्थी म्हटले जाते. पण यामागेही पुराणकाळापासून एक कथा असल्याचे सांगितले जाते.  यामागची कथा तितकीच मनोरंजक आहे. कृतयुगामध्ये अवंती नगरीमध्ये वेदवेत्ते अग्निहोत्री ऋषी भरद्वाज नावाचे एक महान गणेशभक्त होते. त्यांनी सदर युगापासूनच मानवसृष्टीला गणेश पूजेचे महत्त्व पटवून दिले होते. तर या ऋषींकडूनच पृथ्वीच्या गर्भातून अंकारक नामक, जास्वंदी वृक्षाच्या सानिध्यात रक्तवर्णीय भौमपुत्र जन्माला आला होता असे सांगितले जाते. हा पुत्र सात वर्षांचा झाल्यावर पृथ्वीनं त्याला पुन्हा भरद्वाज ऋषींच्या स्वाधीन केले होते. ऋषींनी त्याचे उपनयन केले, वेद शिकविले आणि गणेशमंत्र देऊन उपासना करायला सांगितलं. त्यानंतर हा मुलगा अरण्यात गेला. त्या मुलाने साधारण एक सहस्त्र वर्षे तप करून गणेशाला अर्थात आपल्या आराध्य दैवताला प्रसन्न करून घेतले. ज्या दिवशी गणपती त्याला प्रसन्न झाला तो दिवस म्हणजे अंगारकी संकष्ट चतुर्थी. या पुत्राने स्वर्गात राहून अमृतप्राशन केले आणि त्रैलोक्यात विख्यात व्हायचे वरदान प्रसन्न झालेल्या श्रीगणेशाकडे मागितले. तर प्रसन्न झालेल्या श्रीगणेशानेसुद्धा आपल्या परम भक्ताला हे वरदान दिले की, यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवाराची संकष्टी चतुर्थी ही तुझ्याच अंगारीका या नावाने ओळखली जाईल आणि संबंधित उपासकाला 21 संकष्टी केल्याची फलप्राप्ती या चतुर्थीमुळे मिळेल. तसंच तुझ्या या सहस्र वर्षाच्या तपश्चर्येचे पुण्य युगानुयुगे त्या उपसकांमध्येही वाटले जाऊन त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील. ते ऋणमुक्त होतील. अशाप्रकारे त्रैलोक्यात तू सुविख्यात होशील आणि तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम, अकारका सारखा लाल आहेस म्हणून अंकाकर व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगळ या नावे तुला ब्रम्हांडातल्या आकाशातील ग्रहांमध्ये स्थान मिळेल. याशिवाय तू सदैव अमृत प्राशन करशील. त्यामुळेच गणेशाच्या या वरदानामुळे अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले. त्यामुळेच ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे व्रत अथवा उपवास करणे जमत नसेल अशा व्यक्तींनी अंगारकी मात्र न विसरता आवर्जून करावी . याची फलश्रुती नक्कीच लाभणार असे वेदवचनही दिले गेल्याचे सांगण्यात येते.


जाणून घ्या अंगारक संकष्ट चतुर्थी बद्दल माहिती