बातम्या
राष्ट्रीयीकृत बँकांचा हलगर्जीपणा; लाखो शेतकरी व्याज सवलतीपासून वंचित
By nisha patil - 3/22/2025 8:16:59 PM
Share This News:
राष्ट्रीयीकृत बँकांचा हलगर्जीपणा; लाखो शेतकरी व्याज सवलतीपासून वंचित
राज्यातील ३५ हून अधिक राष्ट्रीयीकृत बँकांनी सहकार विभागाकडे व्याज सवलतीचे प्रस्तावच न पाठविल्याने लाखो शेतकरी प्रोत्साहन अनुदानापासून वंचित राहिले आहेत. या प्रकाराची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर वित्त मंत्रालयाने रिझर्व्ह बँकेच्या महाप्रबंधकांना संबंधित बँकांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
बँकांच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान
अल्पमुदतीच्या पीककर्जाची वेळेत परतफेड केल्यानंतर शेतकऱ्यांना तीन टक्के व्याज सवलत मिळते. मात्र, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, इंडियन बँक, पंजाब नॅशनल बँक, युको बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, येस बँक या प्रमुख बँकांनी प्रस्तावच न पाठविल्यामुळे शेतकऱ्यांना सवलतीपासून वंचित राहावे लागले आहे.
वित्त मंत्रालयाकडून कारवाईचे आदेश
२०२१ पासून तीन लाख रुपयांपर्यंत अल्पमुदतीचे पीककर्ज घेऊन मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन टक्के व्याज सवलतीचा लाभ मिळतो. केंद्र सरकार तीन टक्के आणि राज्य सरकार तीन टक्के, असा एकूण सहा टक्के व्याज परतावा बँकांना देते. मात्र, राष्ट्रीयीकृत बँकांनी या आदेशांकडे दुर्लक्ष केले.
शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची अपेक्षा
राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना देय असलेली व्याज सवलतीची रक्कम व्याजासह वसूल करण्याची मागणी केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या कारवाईनंतर शेतकऱ्यांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रीयीकृत बँकांचा हलगर्जीपणा; लाखो शेतकरी व्याज सवलतीपासून वंचित
|