बातम्या

तणावमुक्त जगा.....

Live stress free


By nisha patil - 12/8/2024 7:36:49 AM
Share This News:



सध्याच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येक माणूस ताण तणावा खाली जगताना दिसून येत आहे. या ताणतणावाचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत असतो. आपल्या रोजच्या आयुष्यातील घटना, काम, कामांचा दबाव, वैयक्तिक बाबी यामुळे मनावर सतत दाब येत असतो. ताण ही क्रियेची प्रतिक्रिया असली, तरी अनेकांच्या बाबतीत ताण ही कायमस्वरूपी समस्या बनू शकते. 

भय म्हणून आपल्यासमोर आलेल्या कशाचाही सामना करण्यासाठीची यंत्रणा म्हणजे तणाव! आपल्या कर्तबगारीच्या किंवा मानसिक आरोग्याच्या सीमा आणि क्षमता जाणून घेण्यासाठी काही प्रमाणात तणाव आवश्यकही असतो. तथापि अतिरिक्त ताणतणाव त्रासदायक ठरू शकतो.

तणावाची लक्षणे व्यक्तिगणिक भिन्न असतात व तणावाच्या प्रकारावर; तसेच व्यक्ती कोणत्या स्तरावर आहे, त्यावर अवलंबून असतात. खूप राग येणे, नैराश्य, पोटाचे विकार, स्नायूंच्या समस्या, खूप घाम येणे, हात-पाय गारठणे, आक्रमकता, नकारात्मकता, अधीरता, शत्रुत्वाची भावना, न संपणारी भीती, मायग्रेन, हिंसक वृत्ती अशी अनेक प्राथमिक ते गंभीर स्वरूपाची लक्षणे असू शकतात. आपले वैयक्तिक आयुष्य असो किंवा व्यावसायिक आयुष्य वेगवेगळे ताणतणाव आपल्यासमोर उभे राहणारच. त्यांना सामोरे जायला शिकले पाहिजे. व्यक्तिमत्त्वविकासात ताणतणावाचे व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचे आहे.

ताणतणाव व्यवस्थापनासाठी काही महत्त्वाच्या टिप्स…
१. कोणत्याही कामाची प्राथमिकता ओळखता यायला हवी. आजच्या युगात कोणतेही काम असेल, ते तुम्ही नीट व्यवस्थापन करून पूर्ण केले तर ते वेळेत तर पूर्ण होतेच आणि तुम्हाला त्या कामाच्या चिंतेपासून निर्माण होणाऱ्या तणावापासून दूर ठेवत.

२. एकसलग काम केल्याने शरीरावर व मनावर ताण येतो, त्यासाठी कामातून छोटा ब्रेक घेऊन निसर्गाच्या सान्निध्यात थोडा वेळ घालवावा. ताण जाणवत असल्यास थोडा वेळ आपल्या आवडीचे काम करावे. अर्थातच आपल्या आवडीच्या कामात आपण मनापासून रमून जातो आणि ताण कमी होण्यास मदत होते.

३. कामासाठी योग्य वेळ, कुटुंब, नातेसंबंध, योग्य विश्रांती, पुरेशी झोप याचा संतुलित जीवनाचे अंतिम ध्येय साध्य करण्यात मदत करते.

४. वाचन, मनन, चिंतन... रुचिसंपन कार्यक्रमांचा आस्वाद घेणे, योग्य व्यायाम, संतुलित आहार आणि बागकाम, संगीत, कला असे आवडीचे छंद जोपासणे यानेही तणाव कमी होण्यास मदत होते.

५. प्राप्त करण्यास योग्य अशा यथार्थवादी उद्दिष्टांची निश्चिती केल्यास सिद्धीची भावना येते व तणावदेखील कमी होतो.

६. गंभीर स्वरूपातील ताणतणावांसाठी औषधोपचार, गरज असल्यास समुपदेशन, वैकल्पिक उपचार, काही वेळाची सक्तीची विश्रांती, आधारगट यांची गरज असते.

एकूणच आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवून आयुष्याचा प्रवास आखला, की ताणतणावांना उत्तमरित्या सामोरे जाण्याची ऊर्मी येते.


तणावमुक्त जगा.....