बातम्या

महावितरणची लकी डिजिटल ग्राहक योजना पहिला लकी ड्रा ७ एप्रिलला

Mahavitarans Lucky Digital Customer Scheme first lucky draw on April 7


By nisha patil - 3/28/2025 9:26:17 PM
Share This News:



महावितरणची लकी डिजिटल ग्राहक योजना पहिला लकी ड्रा ७ एप्रिलला

 मुंबई, दिनांक २८ मार्च २०२५: महावितरणच्या लकी डिजिटल ग्राहक योजनेचा पहिला लकी ड्रा ऑनलाईन पध्दतीने दि. ७ एप्रिल २०२५ रोजी काढण्यात येणार आहे. यातून प्रत्येक उपविभाग स्तरावर एक प्रमाणे  पहिल्या क्रमांकाकरिता ६५१ विजेत्या ग्राहकांना स्मार्ट फोन बक्षिस म्हणून दिला जाणार आहे. तर  प्रत्येक उपविभागात प्रत्येकी दोन प्रमाणे दुसऱ्या क्रमांकासाठी  १३०२ विजेत्या ग्राहकांना स्मार्ट फोन व प्रत्येकी दोन प्रमाणे तिसऱ्या क्रमांकासाठी १३०२ विजेत्या ग्राहकांना स्मार्ट वॉच बक्षिस म्हणून दिले जाणार आहे. यापुढील लकी ड्रा मे व जून २०२५ या महिन्यात काढण्यात येणार आहेत. 

महावितरणने ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढविण्याच्या हेतूने लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी ऑनलाईन पध्दतीने वीज बिल भरणा करणारे सर्व लघुदाब वीज ग्राहक पात्र ठरणार आहेत. १ जानेवारी ते ३१ मे २०२५ या कालावधीत सलग तीन  वा तीन पेक्षा अधिक वीज बिले भरून योजनेच्या लाभाची संधी ग्राहकांना उपलब्ध करण्यात आली आहे.

ही योजना महावितरणच्या अशा लघुदाब चालू (एल टी- लाईव्ह) वीजग्राहकांसाठी लागू असून, ज्यांनी ०१ एप्रिल २०२४ पूर्वी मागील एक वर्ष म्हणजे ०१.०४.२०२३ ते ३१.०३.२०२४ या कालावधीत एकदाही वीज देयकाचा भरणा केलेला नाही किंवा ऑनलाईन वीज देयक भरणा पर्याय वापरलेला नाही. अधिक माहितीसाठी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळास www.mahadiscom.in  भेट द्यावी.

ग्राहक रांगेत उभे राहण्यापेक्षा वेळ, श्रम व पैशांची बचत करीत डिजिटल पध्दतीने वीज बिल भरणा करण्यास प्राधान्य देत आहेत. ग्राहकांना डिजिटल पध्दतीने वीज बिलाचा भरणा करता यावा, यासाठी महावितरणकडून संकेतस्थळ, महावितरण मोबाईल ॲपची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिलेली आहे. ग्राहकांना देय रक्कमेवर ०.२५ टक्के डिजिटल वीज बिल भरणा सूट दिली जाते. परिणामी सध्या राज्यात ७० टक्के हून अधिक वीज ग्राहक ऑनलाईन पध्दतीने वीज बिलाचा भरणा करीत आहेत. हे प्रमाण वाढविण्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहन देण्यासाठी लकी डिजिटल ग्राहक योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेच्या कालावधीत ग्राहकाने नेट बँकिंग, डेबिट कार्ड,  क्रेडिट कार्ड, यूपीआय, वॉलेट, कॅश कार्ड, एनएसीएच, क्यूआर कोड, एनईएफटी, आरटीजीएस इ. ऑनलाईन वीज बिल भरणा पर्याय वापरून लकी ड्रॉ महिन्याच्या अगोदर दरमहा एकप्रमाणे सलग तीन किंवा तीन पेक्षा जास्त महिने वीज बिल भरणे आवश्यक राहील. अधिक माहितीसाठी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळास www.mahadiscom.in  भेट द्यावी.
                                         - मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण, मुंबई


महावितरणची लकी डिजिटल ग्राहक योजना पहिला लकी ड्रा ७ एप्रिलला
Total Views: 18