बातम्या
चौपट मोबदला मिळाल्याशिवाय मोजणी नाही; पोलिस कारवाईला राजू शेट्टींचा इशारा
By nisha patil - 2/28/2025 5:29:36 PM
Share This News:
चौपट मोबदला मिळाल्याशिवाय मोजणी नाही; पोलिस कारवाईला राजू शेट्टींचा इशारा
राज्यातील मंत्र्यांना आणि लोकप्रतिनिधींना कामाच्या टक्केवारीतच रस असल्याने शेतकऱ्यांच्या समस्यांकडे ते दुर्लक्ष करत असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. रत्नागिरी-नागपूर महामार्गासाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिला जात नसल्याचा आरोप करत, चौपट मोबदला मिळाल्याशिवाय मोजणी होऊ देणार नसल्याचा ठराव शेतकऱ्यांनी घेतला आहे.
राज्य सरकारकडे हा प्रस्ताव मागील वर्षभरापासून प्रलंबित असून, जबरदस्तीने भूसंपादनास विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना हातकणंगले पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे शेट्टी यांनी सांगितले. पोलिस बळाचा वापर करून जबरदस्तीने भूसंपादन करण्याचा सरकारचा प्रयत्न हुकूमशाही वृत्तीचा असल्याचा आरोपही त्यांनी केला.
राजू शेट्टी यांनी हातकणंगले पोलिस ठाण्यात जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली आणि मोजणी तातडीने थांबवण्याची मागणी केली. तसेच, शेतकऱ्यांवर अन्याय झाला तर सांगली-कोल्हापूर महामार्ग बेमुदत बंद करण्याचा इशारा दिला. सरकार वेळकाढूपणा करत शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने काढून घेण्याचा डाव आखत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
चौपट मोबदला मिळाल्याशिवाय मोजणी नाही; पोलिस कारवाईला राजू शेट्टींचा इशारा
|