बातम्या
निद्रानाश टाळण्यासाठी काही उपाय
By nisha patil - 6/8/2024 7:25:26 AM
Share This News:
दिवसभराच्या धावपळीनंतर तुम्हाला रात्री नियमित सात -आठ तास झोप घेणे निरोगी आरोग्यासाठी आवश्यक आहे.
१) दिवसा वामकुक्षी घेणे टाळा -
भरपेट जेवणानंतर बऱ्याचदा दुपारी झोप येते. छोटीशी डुलकी घेणे तुम्हाला दिवसभर प्रसन्न ठेवण्यास मदत करेल मात्र वामकुक्षी घेण्याच्या सवयीमुळे तुमच्या रात्रीच्या झोपेचे चक्र मात्र बिघडून, परिणामी दुसऱ्या दिवशी तुम्ही निरुत्साही रहाल.
२) रात्री भरपूर खाणे टाळा -
चांगल्या आरोग्यासाठी सर्वात जास्त सकाळचा नाश्ता , त्याहून थोडे कमी दुपारचे जेवण व सर्वात कमी रात्रीचे जेवण घेणे हितावह आहे. रात्रीचे जेवण भरपेट व अतिमसालेदार देखील असू नये. यांमुळे पित्त व पचनाचे विकार होऊन रात्रीची झोप बिघडू शकते . म्हणून झोपण्यापूर्वी किमान दोन ते तीन तास अगोदर जेवणेच हितावह आहे .
३) धुम्रपान व मद्यपान टाळा -
झोपण्यापूर्वी मद्यपान केल्यामुळे झोप येण्यास मदत होते हा चुकीचा समज आहे. मद्यपानामुळे तुम्हाला झोप आली तरीही ती सुखकारक झोप नसून यामुळे तुम्हाला रात्री सारखी जाग येईल. तसेच धुम्रपानामुळे देखील आरोग्यदायी झोप मिळत नाही . सिगारेटमधील 'निकोटीन' सारख्या घटकामुळे झोपेचे चक्र बिघडते .
४) चहा / कॉफीचे सेवन टाळा -
चहा व कॉफीत आढळणाऱ्या ' कॅफिन' या उत्तेजक घटकामुळे तुम्ही झोप टाळू शकता . तसेच विविध पेयांमध्ये आढळणाऱ्या कॅफिनमुळे रात्री वारंवार मुत्रविसर्जनासाठी शौचालयात जाणे वाढते . त्यामुळे रात्रीच्या वेळी झोपण्यापूर्वी चार ते सहा तास अगोदर चहा , कॉफी यासारखी पेय घेणे टाळा
५) खूप पाणी पिऊ नका -
पोट स्वच्छ होण्यासाठी दिवसभरात भरपूर पाणी पिणे हे हितावह आहे. मात्र रात्री झोपण्यापूर्वी खूप पाणी प्यायल्याने मुत्रविसर्जनासाठी वारंवार उठावे लागल्यामुळे झोपमोड होऊ शकते .
६) झोप येण्यापुर्वीच बिछान्यावर पडू नका -
झोप येण्यापुर्वीच बिछान्यावर लोळणे हे बऱ्याच लोकांमध्ये निद्रानाशाचे प्रमुख कारण असल्याचे दिसून आहे आहे . झोप येण्यापूर्वी बिछान्यावर पडताना मेंदूचे कार्य चालू असते . यामुळे अनेकांना अर्धवट झोप मिळते . म्हणून मेंदू थकल्यानंतर व झोप आल्यावरच बिछान्यावर झोपायला जा.
७) झोपण्यापूर्वी व्यायाम करणे टाळा -
व्यायाम हा सकाळी उठल्यावरच करावा मात्र वेळेअभावी किंवा व्यस्त जीवनशैलीमुळे अनेकदा संध्याकाळी उशिरा व्यायाम केला जातो . यामुळे शरीराचे चलन वाढते व तीव्र निद्रानाश होण्याची शक्यता वाढते . म्हणूनच जर तुम्हाला संध्याकाळी व्यायाम करावयाचा असल्यास तो झोपण्यापूर्वी किमान चार तास आधी करावा .
८) झोपेच्या गोळ्या घेऊ नका
निद्रानाशाचा त्रास असलेल्या व्यक्ती अनेकदा झोपेच्या गोळ्या घेण्याचा मार्ग स्वीकारतात. मात्र याचा अतिवापर केल्याचे नैसर्गिकरित्या झोप येण्याचे प्रमाण कमी होते व त्यातील औषधांचा आरोग्यावर दूरगामी परिणाम होतो .
९) झोपण्यापूर्वी विचार/चिंता करणे टाळा
झोपण्यापूर्वी अनावश्यक गोष्टींचा विचार करत बसणे , चिंता करत राहणे यामुळे तुमची झोप कमी होऊ शकते. तुमच्या मेंदूला मनन करण्यासाठी व दुसऱ्या दिवसासाठी पुन्हा सज्ज होण्यासाठी थोडा वेळ द्या. झोपण्यापूर्वी किमान दोन ते तीन तास अगोदर चिंता व विचार करत बसणे टाळा .
१०) चुकीच्या स्थितीत झोपणे टाळा
पोटावर किंवा पाय पोटात घेऊन झोपणे टाळा , यामुळे तुमच्या अस्थिबंधनावर ( ligaments) ताण येउन तुमची झोप बिघडू शकते . सरळ पाठीवर किंवा गुडघ्याजवळ उशीचा आधार घेत एका कुशीवर झोपणे उत्तम !
निद्रानाश टाळण्यासाठी काही उपाय
|