बातम्या

डोकेदुखीवर मात करायचीय?

Want to beat a headache


By nisha patil - 5/25/2024 6:22:04 AM
Share This News:



प्रत्येक डोकेदुखीकरिता वैद्यकीय हस्तक्षेपाची गरज पडतेच असे नाही. काही प्रकारची डोकेदुखी जेवण न घेतल्याने, स्नायूंचा ताण यांच्यामुळेही होते आणि तिच्यावरचा औषधोपचार घरीच केला जाऊ शकतो. परंतु, काही प्रकारची डोकेदुखी गंभीर बाबींशी संबंधित असू शकते आणि त्यामध्ये वैद्यकीय मदतीची गरज भासते.

डोकेदुखीत शुद्ध हरपत असेल, गोंधळायला होत असेल, द‍ृष्टीत फरक पडत असेल, शारीरिक अशक्‍तपणा येत असेल किंवा तापाबरोबर डोकेदुखी होत असेल तर डॉक्टरी सल्ल्याची गरज आहे, हे समजून घ्यायला हवे.

ताण (टेन्शन), मायग्रेन (अर्धशिशी) आणि क्लस्टर हे डोकेदुखीचे प्रकार आहेत. मायग्रेन व क्लस्टर हे व्हॅस्क्युलर डोकेदुखीचे प्रकार आहेत. यात शारीरिक श्रम जास्त त्रासाचे ठरतात. डोक्याच्या पेशींमधील रक्‍तवाहिन्या यात सुजतात किंवा पसरतात. त्यामुळे ठणका लागून डोके दुखते.

मायग्रेन डोकेदुखीचा प्रकार प्रत्येकासाठी वेगवेगळा असू शकतो; पण सामान्यात: ह्याच्या लक्षणांमध्ये डोक्याच्या दोन्ही किंवा एका बाजूला खूपच दुखणे आणि मळमळ किंवा उलटी होणे, प्रकाश सहन न होणे, द‍ृष्टीत गोंधळ, चक्‍कर येणे, ताप व थंडी वाजणे अशी लक्षणे आढळतात.

मायग्रेन डोकेदुखीला अनेकविध गोष्टी कारणीभूत ठरू शकतात. काही लोकांना विशिष्ट प्रकारच्या आहाराचे वावडे असते. त्यामुळे त्यांच्या डोक्यास ठणका लागतो. काहींना वाईन, चॉकलेट, जुने चीज, प्रक्रिया केलेले मांस तसेच कॉफीन व अल्कोहोलमुळेदेखील मायग्रेन उद्भवते.

क्लस्टर डोकेदुखी ही मायग्रेनपेक्षा जास्त प्रमाणात आढळते. ती सामान्यत: पुन्हा पुन्हा होत राहते. कधी आठवडाभर तर कधी काही महिनेदेखील टिकू शकते. सामान्यत: पुरुषांमध्ये ही क्लस्टर डोकेदुखी मोठ्या प्रमाणात आढळते आणि ती अत्यंत वेदनादायी असते.

मानसिक ताणामुळे किंवा स्नायूंच्या आकुंचनामुळे होणारी डोकेदुखी हीदेखील सर्वत्र आढळणारी त्यामुळे सामान्य प्रकारची मानली जाणारी डोकेदुखी असते आणि ताण जितका वाढता तितकी तीदेखील वाढत जाते.

मानसिक ताणामुळे होणारी डोकेदुखी बहुतेक स्थिर व कमी त्रासदायक असते. ही दुखी कपाळ, कानशिले आणि मानेच्या मागील बाजूला जाणवते. असे आढळून आले आहे की, सर्व प्रकारच्या डोकेदुखींमागचे कारण 90 टक्के वेळा मानसिक ताण हेच असू असते.

सायनस डोकेदुखी हासुद्धा एक वेगळा प्रकार आहे. सायनस डोकेदुखी ही सायनस संसर्ग किंवा अ‍ॅलर्जीमुळे होते. सायनस डोकेदुखीत डोळे, गाल आणि कपाळावर दबाव पडतो आणि खूप दुखते, वरच्या दातांमध्ये दुखल्यासारखे वाटते, ताप व थंडी वाजून येणे, चेहर्‍यावर सूज येणे इत्यादी लक्षणे जाणवतात.

सर्दी किंवा फ्लूनंतर होणारी सायनस डोकेदुखी नाकाच्या वर आणि मागे असलेल्या हाडांच्या पोकळीतल्या सायनस मार्गात सूज आल्याने होते. सायनस तुंबल्यास किंवा त्यांना संसर्ग झाल्यास तो ताण डोक्यावर पडतो आणि डोकेदुखी होते. हे दुखणे फार गंभीर व निरंतर असते, सकाळी सुरू होते आणि वाकल्यावर आणखीच जास्त जाणवते.

मायग्रेन, सायनस, मानसिक ताणातून उद्भवणारी डोकेदुखी आपल्याला नेमक्या कुठल्या प्रकारची डोकेदुखी सतावते आहे, हे निरीक्षणाद्वारे समजून घ्यायला हवे. आपली निरीक्षणे डॉक्टरांना सांगायला हवीत, म्हणजे यथायोग्य उपचार मिळवणे शक्य होईल.


डोकेदुखीवर मात करायचीय?