बातम्या

दूषित पाण्यामुळे कोणते आजार होतात ?

What diseases are caused by contaminated water


By nisha patil - 6/24/2024 6:14:05 AM
Share This News:



नळाचे पाणी कधी कधी खूपच खराब दिसते. गढूळ पाणी पिण्यास अयोग्य असते, हे कोणीही सांगेल: पण वरून स्वच्छ दिसणारे पाणीही पिण्यास योग्य असेलच असे नाही. साध्या डोळ्यांनी न दिसणारे असंख्य जिवाणू व विषाणू तसेच परजीवी त्यात असू शकतात. काही रासायनिक पदार्थ असल्यामुळे किंवा किरणोत्सर्गी पदार्थामुळेही पाणी दूषित होऊ शकते. 

रासायनिक पदार्थ कोणता आहे, यावर रोगाची लक्षणे अवलंबून राहतील. पाण्यात जिवाणू असतील तर ते पाणी पिण्याने टायफॉईड, कॉलरा, हगवण असे रोग होऊ शकतात. विषाणूंमुळे कावीळ, पोलिओ यांसारखे रोग होतात. परजीवी जंतूंमुळे अमिवा व जिआर्डीया यांची लागण होते. गोल कृमी, अंकुश कृमी, तंतू कृमी इत्यादींची लागण त्या जंतूंची अंडी पाण्यात असतील तर होते. 

पाण्यात सायक्लोप्स नावाचे किटक असल्यास नारू हा रोग होऊ शकेल, तर गोगलगायीमुळे शिस्टोसोमीयासीस हा रोग होईल. दूषित पाण्यामुळे असे अनेक रोग होतात. 

नुसते पाहून पाणी चांगले की वाईट ते कळत नाही. त्यामुळे पिण्याच्या आधी ते शुद्ध आहे याची खात्री करून घ्यावी हेच चांगले. पाण्यात तुरटी फिरवणे, गाळणे, उकडून गार करणे या उपायांनी जतूंचा नाश होतो. क्लोरीनच्या गोळ्या वा द्रावण वापरून गुद्धा पाणी शुद्ध करता येते. ही पाण्याच्या शुद्धिकरणाची स्वस्त व परिणामकारक अशी पद्धत आहे. पाण्याच्या बाबतीत दिसते तसे नसते. म्हणून जग त्याला फसते ही म्हण अगदी सार्थ ठरते. परंतु योग्य ती काळजी घेतल्यास प्रदूषित पाण्यापासून होणाऱ्या रोगांना आपण सहजपणे प्रतिबंध करू शकतो.


दूषित पाण्यामुळे कोणते आजार होतात ?