बातम्या

जाडेपणा म्हणजे नेमके काय ?

What exactly is obesity


By nisha patil - 4/26/2024 10:02:54 AM
Share This News:



शरीरातील चरबीचे प्रमाण नको एवढे वाढत गेले, तर जाडी व वजन वाढते. चरबी प्रत्येकाच्या शरीरात असतेच, पण तिचे सर्व शरीरभर योग्य त्या पद्धतीत विवरण करण्याची व्यवस्था निसर्गानेच केलेली असते. जेव्हा आपण गरजेपेक्षा जास्त खाऊ लागतो, तेव्हा ही व्यवस्था बिघडायला सुरुवात होते. खाण्यात आलेल्या अन्नातून उष्मांक मिळतात. हे उष्मांक जेव्हा रोजच्या रोज खर्च होत नाहीत, तेव्हा शरीर ते साठवू लागते. ही साठवण्याची शरीराची पद्धत म्हणजे चरबीचा साठा वाढवणे.

पोटावर, मांड्या मधील जागेत, नितंबांवरील व हातांच्या दंडा मागील भागात प्रथम चरबी साठू लागते. पुरुषा मध्ये जाड माणसाला सफरचंदाचा, तर स्त्रिया मध्ये पीअर या फळाचा आकार प्राप्त होऊ लागतो. सर्वसाधारण आकडेवारीनुसार उंची, वय व वजन यांचे जेवढे प्रमाण असायला हवे, त्यापेक्षा वजन जास्त असेल, तर माणूस जात आहे, त्याने चरबी साठवायला सुरुवात केली आहे, असे समजावे. याखेरीज कातडी मधील चरबीचा साठा रास्त व जास्त आहे, हे ठरवण्यासाठी विशिष्ट पद्धतीचे चिमटेही मिळतात. या बाबतीत सोपा घरगुती अंदाज म्हणजे दंडा मागील कातडी छोट्या चिमटीत पकडता आली तर चरबीचा साठा रास्त व न आली तर जास्त, असे समजावे.

प्रत्येक प्राण्या मध्ये चरबीचा साठा करणे व वापरणे यांवर निसर्ग नियंत्रण ठेवतो. पण माणूस त्याच्या अति खाण्याने व ऐदी वागणुकीने हे नियंत्रण झुगारू पाहतो. साखर, लोणी व मोटार वाहन वापर यांमुळे मानवाने स्वतःचे संतुलन घालवले आहे, असे डॉक्टर मंडळी म्हणतात. वाहनांमुळे हालचाल संपली, साखरेने नको असलेले उष्मांक पोटात वाढू लागले, तर लोण्यामुळे चक्क चरबीच पोटात वाढू लागली. विसाव्या शतकात जाड माणसांचे प्रमाण व त्यातून उद्भवणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढले आहे.

जाड माणसाला जास्त घाम येतो. घामाला वास येत राहतो. थकवा जाणवतो, धाप लागते, जास्त तहान लागते, सतत खावेसे वाटते, खाऊनही समाधान होत नाही. या साध्या साध्या लक्षणा नंतरही लक्ष दिले नाही, तर हळूहळू जाड माणसाच्या शरीरात मधुमेह, रक्तदाब, रक्तवाहिन्यांचे विकार व त्यांतूनच उद्भवणारा हृदयविकार यांचा शिरकाव होतो. वजन जास्त वाढल्याने सांध्यांची झीज होत जाऊन सांधेदुखी, तर पायांतील रक्तवाहिन्यांना शिथिलपणा आल्याने पायांत रक्त साचून पाय दुखणे, सूज येणे सुरू होते. जाड माणसे अपघाताला जास्त निमंत्रण देतात. रस्ता ओलांडताना अचानक आलेले वाहन धडकणे, जिन्यावर तोल न सावरता येणे यांतून हे अपघात घडतात.

पूर्ण उपवासाने जाडी कमी करणे हे सोपे आहे. पण कमी केलेली जाडी तशीच टिकवणे हे मात्र अत्यंत कठीण काम आहे. एका आकडेवारीनुसार जाडी कमी केलेल्यांतील जेमतेम ५ टक्के लोकच ती तशीच टिकवण्यात यशस्वी होतात. एकंदरीत खाण्या पिण्याच्या पद्धतीत व जीवन पद्धतीत अत्यंत नियमितपणा आणून सुयोग्य व्यायाम केला, तरच जाडी आटोक्यात राहू शकते.

स्त्रियांमध्ये प्रसूती नंतर, विद्यार्थ्यांत बैठे काम सुरू झाल्यावर, मध्यम वयात म्हणजे चाळीस ते पन्नास या दरम्यान वजन वाढू लागते. नियमित व्यायाम केल्यास आणि तेलकट, तळकट व गोड खाणे मोजकेच ठेवल्यास जाड होण्याची भीती बाळगायची गरज नाही. हजारभर जाड माणसात एखाद्याचीच जाडी अनुवांशिक असते. ती आटोक्यात आणणे मात्र डॉक्टरांनाच शक्य असते. पण उरलेले सर्वजण मात्र 'हे कोणालाच शक्य नाही' अशा समजुतीत वावरतात.
जगातील सर्वात जाड इसम 'जॉन मुनाॅक' याचे वजन होते सहाशे पस्तीस किलोग्रॅम. १९८३ साली त्याचे जेमतेम बेचाळीसाव्या वर्षी निधन झाले. हा विक्रम आजही अबाधित आहे.


जाडेपणा म्हणजे नेमके काय ?