बातम्या

अल्ट्रासोनोग्राफी म्हणजे काय ?

What is ultrasonography


By nisha patil - 5/14/2024 6:35:03 AM
Share This News:



अल्ट्रासोनोग्राफी यंत्राच्या सहाय्याने तपासणी ही आता वैद्यकीय क्षेत्रातील एक अत्यंत गरजेची बाब झाली आहे. पोटात दुखणे, मुतखड्याचे निदान, शरीरातील एखाद्या अवयवाला आलेली सूज, नको असलेला द्राव कुठे साठीला असला, तर त्याची जागा, गर्भनिदान, गर्भाच्या अवयवांची वाढ व त्यातील उणिवा, दोष या व अशाच कितीतरी बाबतीत डॉक्टरमंडळी सोनोग्राफी करून निदान करतात. सोनोग्राफीचे यंत्र कानाला ऐकू न येणाऱ्या ध्वनीची कंपने शरीरात पाठवते. कातडीवर जेलीसारखा द्रवपदार्थ लावून ज्या भागाची तपासणी करायची आहे तेथे ही कंपनी पाठवणारा भाग, ट्रान्सड्युसर टेकवला जातो. ट्रान्सडय़ुसर म्हणजे संदेशांचे रूपांतर करणारा. येथे ध्वनीसंदेशाचे वीजप्रवाहात रूपांतर होते. शरीराच्या अंतर्भागात शिरून तपासणी जास्त अचूकतेने करायची असेल, तर त्या आकारायोग्य भाग यंत्राला जोडता येतो. त्यामुळे गुदद्वारावाटे, योनीमार्गाद्वारे अंतर्गत भागाचे जास्त जवळून परीक्षण करता येते. यंत्राद्वारे शरीरात पाठवली जाणारी ध्वनीकंपने शरीरातील विविध भागांवर आदळतात व प्रतिध्वनीप्रमाणे परत फिरतात. परत आलेल्या ध्वनीकंपनांचा चित्ररूप नकाशा टीव्हीसदृश्य पडद्यावर डॉक्टरांना पाहता येतो. रुग्णाला त्याची व्हिडिओप्रत तयार करून देता येते. यामुळे जसा क्षकिरण तपासणीचा फोटो अनेकांना पाहता येतो, जपून ठेवता येतो, तसाच याही तपासणीचा फोटो किंवा व्हिडिओप्रतीचा उपयोग होतो. शरीरातील प्रत्येक पेशी समूहाची ध्वनीकंपने शोषणाची व प्रतिध्वनी परत पाठवण्याची पद्धत व क्षमता वेगवेगळी असते. तसेच पोकळी, कॅन्सरसारख्या कडक पेशी, द्रवपदार्थ यांतील फरकही यातून स्पष्ट होत असतो. यामुळे आजाराचे, विकृतीचे निदान सुस्पष्ट होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चाचणीचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत, यात कोणताही धोका नसतो. यासाठी रुग्णाची कोणतीही पूर्वतयारी करायला लागत नाही. याआधी अस्तित्वात असलेल्या क्ष किरण तपासणीमुळे ती वारंवार केल्यास रुग्णाच्या शरीरातील पेशींवर परिणाम होण्याची शक्यता असे. तसेच गर्भवती महिलांच्या गर्भावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने त्यांच्यासाठी तर ती वर्ज्यच असे.

हृदयरोगतज्ञ अल्ट्रासोनोग्राफी तंत्राचा वापर करणाऱ्या अधिक प्रगत व खूप महाग यंत्राच्या साह्याने हृदयाचा व शरीरातील विविध रक्तवाहिन्यांचा अभ्यास करू शकतात. यातून हृदयाचे कप्पे, रक्त प्रवाहाचा वेग, आतील झडपा यांच्या विकाराचे निदान होते. या तपासणीला टु-डी एको किंवा 'टू डायमेंशनल एकोग्राफी' व 'कलर डॉप्लर तपासणी' असे म्हणतात.


अल्ट्रासोनोग्राफी म्हणजे काय ?