बातम्या

तोंडाला पाणी का सुटतं ?

Why is the mouth watering


By nisha patil - 8/5/2024 11:17:37 AM
Share This News:



आपल्या तोंडात लाळग्रंथी असतात. यांचं काम तोंडात लाळेचा स्राव करण्याचं असतं. लाळे मध्ये असलेले काही पाचक पदार्थ व विकरं अन्नाच्या पचनात मोलाची भुमिका बजावत असतात. त्यामुळे जेव्हा आपण अन्नाचा घास तोंडात घेतो तेव्हा या ग्रंथीं मधुन आपोआप लाळेचा पाझर व्हायला सुरुवात होते. त्या घासाचे दातांकडुन तुकडे पडत असताना त्यात लाळ मिसळुन त्यातल्या विकरांमुळे म्हणजेच रासायनिक कातर्‍यांमुळे त्यातील रसायनांच्या रेणुंचे तुकडे व्हायला सुरुवात होते. पचन व्हायला तिथुनच सुरुवात होते.

या ग्रंथी काहीवेळा अधिकच उत्साह दाखवतात. त्यामुळे घास प्रत्यक्षात तोंडात पडण्यापुर्वी त्याच्या येण्याची वाट न पाहताच त्या कामाला लागतात. आपण अन्नाची चव जशी जिभेनं घेत असतो तशीच ती नाकानेही घेत असतो. खरं तर अन्नाचा स्वाद आणि सुगंध या दोन्हींचा वापर करुन आपण अन्नाची चव चाखत असतो. त्यामुळे आवडत्या किंवा मसालेदार पदार्थांचा सुगंध वातावरणात दरवळु लागला की त्या वासानंच आपली भुक चाळवली जाते.

साहाजिकच तो पदार्थ आपल्या तोंडात कधी पडतो, याचीच वाट आपण पाहु लागतो. त्या भावनेपोटी मग आपल्या मेंदुतील विवक्षित मज्जापेशी उत्तेजित होतात. त्या आपलं काम करायला सुरुवात करतात आणि लाळग्रंथींना संदेश पाठवु लागतात. त्यांना प्रतिसाद देत मग त्या ग्रंथी कार्यान्वित होतात. त्यांच्या मधुन लाळेचा पाझर होऊ लागतो. यालाच आपण पाणी सुटणं असं म्हणतो.

काही वेळा अन्नाला तसा सुवास नसतो. पण तो पदार्थ पाहुनही मज्जापेशी चाळवल्या जातात आणि लाळग्रंथींना आदेश मिळतो. तोंडाला पाणी सुटतं ते यामुळेच. अशारितीनं ती एक प्रतिक्षिप्त म्हणजेच आपोआप होणारी घटना आहे.


तोंडाला पाणी का सुटतं ?