बातम्या
योगाभ्यास करण्यापूर्वी प्रथम वज्रासन शिका
By nisha patil - 7/30/2024 7:30:25 AM
Share This News:
योगाभ्यासासाठी योग्य अशी शांत, एकाग्र मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती वज्रासनामुळे लवकर साध्य होते. म्हणून सुरुवातीस हे आसन केल्यामुळे पुढील योगाभ्यास उत्तम होतो. ओटीपोटातील रक्ताभिसरण सुधारते. जननेंद्रियांचे आरोग्य चांगले राहते. पाठीच्या कण्यातील दोष नष्ट होतात.
वज्रासनात आसनामध्ये पायांची बैठक वज्राप्रमाणे पक्की असते. म्हणूनच यास वज्रासन म्हणतात. वज्र म्हणजे इंद्राचे अस्त्र, व्रज म्हणजे जननेंद्रिय असे त्याचे अर्थ आहेत. हे असासन नियमित केल्याने जननेंद्रियावर व ओटीपोटावर लाभदायक परिणाम होतो.
वज्रासन करण्यासाठी प्रथम दोन्ही पाय एकमेकांजवळ ठेवून पाय पसरून बसावे. हात नितंबाच्या दोन्ही बाजूंना जमिनीवर ठेवावेत. डाव्या हातावर व बाजूवर शरीराचा भार घेऊन उजव्या हाताच्या मदतीने उजवा पाय गुडघ्यात दुमडावा. उजव्या पायाचा तळवा आकाशाच्या दिशेने ठेवून पाऊल मागे न्यावे. अशा प्रकारे उजव्या नितंबाखाली उजवे पाऊल व्यवस्थित ठेवावे. आता शरीराचा भार उजव्या हातावर व बाजूवर घेऊन वरीलप्रमाणे कृती करून डाव्या पायाचे पाऊल डाव्या नितंबाखाली स्थिर करावे. या स्थितीमध्ये दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना लागतील याची काळजी घ्यावी.
पाश्र्वभाग उलट्या पावलांवर व्यवस्थित पक्का करावा. ओटीपोटाचा भाग थोडा पुढे करावा. पाठीचा कणा ताठ ठेवावा. हातांचे तळवे गुडघ्यांवर किंवा गुडघ्यांजवळ मांडीवर ठेवावेत. पोट व हाताचे स्नायू ढिले सोडावेत. डोळ्यांच्या पापण्या अलगद मिटाव्यात. लक्ष श्वासावर केंद्रित करावे. हीच वज्रासनाची अंतिम स्थिती होय. अशा सुखकारक आसनामध्ये श्वासोच्छ्वास आपोआप शांत, सावकाश व दीर्घ होतो. त्यामुळे मन एकाग्र होण्यास मदत होते. हे आसन सोडताना डोळे उघडून तळहात मांड्यांवरून खाली जमिनीवर ठेवावेत. दोन्ही पाय एकेक करून सरळ करावेत. वज्रासन हे ध्यानासाठी योग्य आसन आहे.
योगाभ्यास करण्यापूर्वी प्रथम वज्रासन शिका
|